परभणी(प्रतिनिधी) शिकवणीला पायी जात असताना अल्पवयीन मुलीची एकाने छेड काढली व वाईट हेतुने हात धरला. याचा जाब व विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करुन चाकुने मारुन जखमी केले. यानंतर छेड काढणार्या युवकालाही मारहाण करत चाकुने हल्ला करुन जखमी करण्यात आले. ही घटना परभणी शहरातील पंचशिल नगरात 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकमेकांच्या तक्रारीनुसार परस्पर विरोधी तक्रारीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, घराजवळ राहणार्या एका 26 वर्षीय युवकाने पेन मागण्याच्या बहाण्याने तिची छेड काढली. गाडीवर बस तुला शिकवणीला सोडतो, असे म्हणत वाईट हेतुने हात धरला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिडितेचे वडिल विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर चाकुने हल्ला करुन जखमी करण्यात आले. तर दुसरी तक्रार 26 वर्षीय युवकाने दिली आहे. 3 आरोपींनी मिळून तु माझ्या मुलीची छेड का कढतो, असे म्हणत चाकुने मारुन गंभीर जखमी केले, अशी तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.