त्या प्रकरणात बाबाजानी दुर्राणी यांचा अटकपूर्व जामीनअर्ज नामंजूर
गंगाखेड अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय
पाथरी.(प्रतिनिधी) पाथरीतील ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण कांबळे यांच्या आत्महत्या प्रकरणात गंगाखेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
पाथरी येथे 13 ऑगस्ट रोजी शहरातील ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण कांबळे यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील आखाड्यावर आढळून आला. या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.परंतु पंचनामा करतेवेळी मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी तक्रारीआधारे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व विजय प्रभाकर वाकडे (रा.पाथरी) यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दुर्राणी यांनी गंगाखेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती डी.डी. कुरुळकर यांनी या प्रकरणात सरकारी वकिल सचिन पौळ व दुर्राणी यांचे वकिल यांचा दोन्ही बाजूंनी युक्तीवाद ऐकूण घेतला आणि दुर्राणी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.