नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या प्रवाशांची बस नदीत कोसळली, 27 जणांचा मृत्यू, 16 जखमी
नेपाळमधील पोखरा-काठमांडू दरम्यान मर्स्यांगदी नदीत महाराष्ट्रातील प्रवाशांची बस कोसळली आहे. तनाहूचे मुख्य जिल्हा अधिकारी जनार्दन गौतम यांनी या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तसेच 16 लोकांवर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
बसमध्ये वाहक आणि चालकांसह एकूण 43 जण होते अशी माहिती मिळाली आहे. त्यापैकी बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, तळवेल परिसरातील आहेत.
या अपघातानंतर बाधितांना पूर्णपणे मदत केली जात असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
काठमांडूतील दुर्घटनेबाबत मी संरक्षण मंत्रालयाशी बोललो आहे. गृहमंत्र्यांनी नोडल ऑफिसरची नियुक्ती केली आहे, असं त्यांनी सांगितलंच. तसंच मृतदेह वायुसेनेच्या विमानानं नाशिकला नेले जातील. जखमींवर उपचार सुरू आहेत, असंही शिंदे म्हणाले.