परभणीच्या नवा मोंढा परिसरातून 109 पोते रेशनचे धान्य जप्त
परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची नवा मोंढा परिसरात कारवाई
परभणी (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 26ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास नवा मोंढा परिसरात एका दुकानावर कारवाई करत दुकानाच्या शटरमध्ये ठेवलेले तांदूळ, गव्हाचे पोते जप्त केले. रेशनचे धान्य असल्याच्या संशयावरून गव्हाचे 85 पोते आणि तांदळाचे 24 मिळून 1 लाख 53 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड यांच्या आदेशाने सपोनि. राजू
मुत्तेपोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान, शेख रफिक, निलेश परसोडे, यांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या पथकाला नवा मोंढा परिसरातील अराध्या ट्रेडिंग कंपनी, तोष्णीवाल ब्रदर्स मटेरियल सप्लायर्सच्या समोर शटरच्या दुकानात रेशनचे धान्य असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी कारवाई केली असता त्या ठिकाणी राम श्रीधर कुलथे हा इसम मिळून आला. धान्या विषयी विचारणा केल्यावर त्याने पावत्या नसल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे सदरचे धान्य जप्त करुन
पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलिसांच्या पुढील स्वाधीन केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.