परभणी शहरातील मासुम कॉलनी भागात एका घरात चोरी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना शनिवार 31ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
शहरातील मासुम कॉलनी येथे शेख शफिक यांचे घर आहे. ते खाजगी शिकवणीचे वर्ग चालवतात. शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी रात्री ते परिवारासह पाहुण्यांच्या घरी गेले होते. शनिवारी सकाळी सहा वाजता घरी परत आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी आलमारीतील रोख रक्कम, सोन्या – चांदीचे दागिने मिळून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक ननवरे, पोउपनि. कोपलवार, पोहेकॉ. जंगम, शेख गौस, विशाल गायकवाड, गुणाजी भोळे, नितीन कजबे, पुरणवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वास पथक, ठसे पथकालाही पाचारण करण्यात आले. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.