परभणी जिल्ह्यात 28 हजार 146 नवीन मतदार
परभणी(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदाराच्या अंतीम याद्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्ध केल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक आयोगाने राज्याच्या आयोगाने दिलेल्या सूचने प्रमाणे अंतीम मतदार याद्या तयार केल्या असून शुक्रवारी त्या याद्या जाहीर केल्या आहेत. त्या याद्या नुसार या जिल्ह्यात 28 हजार 146 मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे.
आयोगाने दिलेल्या माहिती प्रमाणे गंगाखेड विधानसभा मतदार संघात अन्य तीन मतदारसंघाच्या तूलनेत सर्वाधिक म्हणजे 4 लाख 15 हजार 808 मतदारांची संख्या समाविष्ट असून त्यात 2 लाख 15 हजार 678 पुरुष व 2 लाख 124 महिला तर 6 तृतीयपंथी मतदारांची संख्या आहे. अन्य तीन विधानसभांच्या तुलनेत परभणी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 3 लाख 44 हजार 735 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यात 1 लाख 76 हजार 544 पुरुष, 1 लाख 68 हजार 182 महिला तर 9 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघात अंतीम मतदार यादी प्रमाणे 1 लाख 98 हजार 344 पुरुष, तर 1 लाख 85 हजार 459 महिला व 10 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 83 हजार 813 मतदार समाविष्ट आहेत. पाथरी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 87 हजार 951 एवढे मतदार असून त्यात 2 लाख 835 पुरुष तर 1 लाख 87 हजार 114 महिला व 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकूण 15 लाख 32 हजार 307 मतदारांची नोंद करण्यात आली असून त्यात 7 लाख 91 हजार 401 पुरुष, 7 लाख 40 हजार 878 महिला तर 27 तृतीयपंथीयांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली.