गावनिहाय नुकसानीचे पंचनामे करून त्वरित अनुदान वितरित करा
माजी आमदार बाबा जानी दुर्रानी यांची मागणी
परभणी (प्रतिनिधी) पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत पाथरी, मानवत, सोनपेठ व परभणी तालुक्यातील समाविष्ट गावांना 1 व 2 सप्टेंबर रोजीच्या अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या चारही तालुक्यातील गावनिहाय शेतपिकाचे तातडीने पंचनामे करावेत तसेच विद्युत मोटारी, जनरेटर, कृषिधन तसेच अन्य अन्य नुकसानीबद्दल अनुदान वितरीत करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केली. माजी आमदार दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे भेट घेतली. या भेटीतून पाथरी मतदारसंघांतर्गत विविध गावातील खरीप पिकांची भयावह अवस्था निदर्शनास आणून दिली. सर्वसामान्य शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे प्रशासनाने तातडीने स्थळ पंचनामे करावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. पाथरी तालुक्यातील माळेवाडी शिवार, बोरगव्हाण, सिमूरगव्हाण, खेडूळा, खर्डा, बाभळगाव, कासापुरी, मानवत तालुक्यातील वझूर बु., वझुर खु., हमदापूर, रामपुरी, टाकळी निलवर्ण, मानोली, सावळी, सोमठाणा, कोल्हा, केकरजवळा, सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव, शिरोळी, शिर्शी, लोहीग्राम तांडा, गंगापिंप्री, गोळेगाव, लासीना, वाणीसंगम, दुधगाव, शेळगाव हाटकर, शेळगाव मराठा, भाऊचा तांडा, भिसेगाव, आवलगाव, खडका, पोहंडुळ, मोहवळा, वैतागवाडी, उक्कडगाव, मुक्ता उक्कडगाव, धामोणी, डिघोळ, नरवाडी, खपाटपिंप्री, चुकार पिंपरी, नैकोट व गोंदरगाव या भागात नुकसानीचे स्थळ पंचनामे करावेत व मदतीच्या रक्कमा तातडीने वितरित कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.