स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
आठ जुगार्यांना पकडले, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी(प्रतिनिधी)
शहरातील गंगाखेड रोड वर एका पत्र्याच्या शेडमध्ये अंदर बाहर नावाचा जुगार खेळविला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास तेथे छापा टाकून कारवाई केली. यात 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण 6 लाख 47 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप,पोलीस अधीक्षक रविंंद्रसिह परदेशी यांंच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस निरीक्षक राजु मुत्येपोड, पोह मोहन लाड, पोह हुसेन पठाण, पोह इंद्रजीतसिसंग बावरी, पोशि निलेश परसोडे यांचे पथक परभणी ग्रामीण हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून केसेस करण्यासाठी पेट्रोलींग होते. पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की काहीजण रोजची जागा बदलून जुगाराचे क्लब चालवत आहेत. गंगाखेड रोडवरीज कृष्ण चैतन्य हॉटेलच्या बाजुला पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम पत्यावर पैसे लावून अंदरबाहर नावाचा जुगार खेळ खेळत आहेत अशी पक्की बातमी मिळाल्यावरुन त्याची शहानिशा करुन सायंकाळी 5.45 वा. तेथे छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी आढळलेले सुधीर लोखंडे, श्रीनिवास नारलावार, बालासाहेब सावळे, गंगाधर पत्तीकोंडा,दिगांबर झाटे, महेश परकेंडकर, तुकाराम शेळके, प्रकाश कौसडीकर यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ 82 हजार 10 रूपये नगदी, 10 वाहने व 14 मोबाईल असा एकूण 6 लाख 47 हजार 10 रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करून सर्वांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावर एकूण 6 मोबाईल व 8 दुचाकी सोडून पळून गेलेले फरार 14 आरोपी व पकडलेले 8 जण तसेच क्लब चालक कलीम कुरेशी व जागामालक अशा एकुण 24 आरोपींविरूध्द सपोनि राजु मुत्येपोड यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.