जुन्या प्रस्थापितांना मात देण्यासाठी नवी पिढी उत्सुक
परभणी : जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर व पाथरी या विधानसभा मतदार संघात प्रस्थापितांना मात देण्यासाठी जुनी व नव्या पिढीतील इच्छूक योद्धे कामाला लागले असून यंदाची आमदारकीची ही निवडणूक भल्या भल्या राजकीय पंडितांचे गणीते बिघडवणारी ठरू शकते, असा सुर निघत आहे. लोकसभेत अजेय राहिलेला शिवसेनेचा हा गड विधानसभेला कोणाच्या पारड्यात मताचे ‘दान‘ टाकणार हे पाहणेही तितकेच मजेशीर ठरणार आहे.
परभणी जिल्ह्याचे राजकारण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. देशात व राज्यात दोन वेळा सेना-भाजपा युतीच्या सत्तेचा अपवाद वगळता या जिल्ह्याने नेहमीच प्रवाहाच्या विरूद्ध असलेल्या उमेदवारांना सभागृहात पाठवल्याचा इतिहास आहे. सन 1989 ची लोकसभा असो की सन 1991 ची विधानसभा परभणी विधानसभेत आजवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. परंतू, सन 2009 व सन 2014 व2019 च्या निवडणूकीपासून या मतदार संघात सेनेचा विजय झाला असला तरी दुसर्या क्रमांकाची मते घेणारे मुस्लीम समाजाचे उमेदवार अजुनही स्मरणात आहेत. ‘ खान की बाण‘ या एकाच वाक्याभोवती फिरणारे परभणी विधानसभेच्या राजकारणाला मागील लोकसभेपासून कलाटणी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला भरभरून मते दिली. तरी यंदा वंचित बहूजन आघाडी, एम आय एम, या पक्षाच्या प्रवेशाने परिस्थिती बदलण्याची चिन्हे आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्ये परभणी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटतील हे अजून निश्चित नाही तरीही इच्छुकांनी फिल्डिंग व काम करणे सुरू केले आहे. परभणी विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वकष उमेदवार देवूनही मतदारांनी त्यांना नाकारल्याचा इतिहास आहे. यंदा मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट ही तिघे एकत्र असल्याने परभणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा वरचष्मा आहे.
गंगाखेड मतदार संघ हा लक्ष्मीअस्त्राच्या भरोश्यावर असला तरी यंदा नवीन इच्छूक व तरूणांच्या फळीने प्रस्थापितांचे धाबे दणाणून सोडले आहेत. गंगाखेड ठिकाणी यंदा पुन्हा ‘अपक्ष‘च परंतु, तरूण वर्गातील उमेदवार निर्णायक ठरू शकतात. जिंतूरात पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेे ते विद्यमान आ.भांबळे व माजी आ.बोर्डीकर कन्या सौ.मेघना साकोरे यांच्यात खरी लढत होईल. परंतु, या मतदार संघाची भौगोलिक व सामाजिक रचना पाहता या ठिकाणी ही ‘वंचित‘ फॅक्टर जायंट किलर ठरू शकते. सध्यास्थितीत सर्वाधिक चर्चीला जाणारा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणार्या पाथरी मतदार संघात सध्या हौसे, गवशे इच्छूकांची भाऊगर्दी झाली आहे. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला असून सन 2009 मध्ये सौ.मिराताई कल्याणकर रेंगे पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले आहे.
तर सन 2014 च्या निवडणुकीत पुर्वीचे शिवसेनेचेच अपक्ष मोहन फड यांनी आमदारकी मिळवली. सध्या ते भाजपवाशी असून हा मतदारसघ सोडवून घेणार असल्याचे वृत्त आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला येथून नीट मिळाली आहे. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरलेले काँग्रेसचे सुरेश वरपूडकर यांना काँग्रेस पुन्हा संधी देणार का किंवा हा मतदारसंघ महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांना दिला जाणार यावरच माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचं भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना उमेदवार म्हणून घोषित केले असल्याने ते कामास लागले आहेत. या मतदारसंघात
कुणबीसह इतर वंचित समाजाची मते त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरू शकतात.
दरम्यान, निवडणुकीला अजून काही महिन्यांचा अवधी असला तरी सर्वच पक्षातील इच्छूकाकडून दावे-प्रतिदावे केल्या जात आहेत. पाथरी व परभणी व जिंतूर विधानसभेत लोकसभा निवडणुकीवेळी घडलेले मताधिक्यच ‘महाविकास’आघाडीच्या च्या विजयाचे संकेत देवू लागले आहेत.