परभणी(प्रतिनिधी)
शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.1 सप्टेंबर रोजी एक दुचाकी चोरीस गेली होती. सदरील गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या वाहनासह आरोपीला पकडून नानलपेठ ठाण्यात हजर केली आहे.
पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी परभणी शहरातील दुचाकी चोरींच्या घटनांबाबत सुचना देऊन गुन्हे उघड करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजु मुत्येपोड, जमादार रवी जाधव, पोलीस कर्मचारी शेख रुफीयोद्दीन, निलेश परसोडे यांनी गुप्त माहिती काढून आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. गुप्त बातमीदाराने खबर दिली की, नानलपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुरन 470/2024 मधील वाहन हे कौडगाव रेल्वे गेटजवळ राहणारा सय्यद अकबर याने चोरले आहे. त्यावरून सय्यद अकबर सय्यद हबीब (रा.कौडगाव रेल्वे गेट परिसर, परभणी) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ही गाडी चोरल्याची कबुली दिली व गाडी त्याच्या घरासमोर उभी केल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्ह्यात चोरीला गेलेली काळ्या रंगाची फिक्कट निळसर पट्टा असलेली दुचाकी (चेचीस क एम बी एल एच ए आर 888 जे एच 65694) ताब्यात घेऊन आरोपीसह नानलपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.