देश

मनाची प्रसन्नता टिकविण्याची गरज डॉ.जगदीश नाईक यांचे प्रतिपादन

सेलूतील गणेशोत्सव व्याख्यानमालेला सुरूवात

सेलू (प्रतिनिधी)येथील गणेशोत्सव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मानसोपचारतज्ज्ञ डॉ.जगदीश नाईक यांनी शुक्रवारी गुंफले. यावेळी डॉ.प्रकाश आंबेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सध्याच्या अस्वस्थ वातावरणात दगदग, ताणतणाव वाढत चालला आहे. त्यामुळे आयुष्य उत्तम प्रकारे जगण्यासाठी आत्मिक शांतता आणि मनाची प्रसन्नता टिकविण्याची नितांत गरज आहे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ.जगदीश नाईक यांनी शुक्रवार 13 सप्टेंबर व्यक्त केले. सेलू येथील नूतन विद्यालयाच्या सभागृहात आयोजित 63 व्या गणेशोत्सव व्याख्यानमालेचे पाहिले पुष्प डॉ.नाईक यांनी गुंफले. ‘मन करा रे प्रसन्न’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी मानसोपचारतज्ज्ञ डॉ.प्रकाश आंबेकर (जालना) होते. डॉ.नाईक म्हणाले, ‘’ आदीदैविक आणि आदी भौतिक ताप आपल्या हाताबाहेर आहे. परंतु आत्मिक तापावर नियंत्रण मिळविणे आपल्याला शक्य आहे. आज किरकोळ कारणावरून मनाची घालमेल आणि अस्वस्थता वाढत चालली आहे. त्यामुळे आहे ती परिस्थिती स्वीकारली पाहिजे. काही क्षुल्लक गोष्टीकडे दुर्लक्ष केले पाहिजे. त्यासाठी भावनांवर नियंत्रण राखणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विवेकाने वागणे आवश्यक आहे. आणि याची सुरूवात स्वत:पासूनच करावी लागणार आहे.
डॉ.प्रकाश आंबेकर म्हणाले,”धावपळीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या जगात मनाचा तोल सांभाळता आला पाहिजे. आज दारू आणि अन्य व्यसनांची जागा सततचा मोबाईल आणि वाढत्या इंटरनेटच्या वापराच्या व्यसनाने घेतली आहे. प्रत्येक कुटुंबाला ही मानसिक आजाराची समस्या भेडसावत आहे. हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. आणि दुःख वाट्याला देणार्‍या भूतकाळाची आणि भविष्याची चिंता न करता, वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे. जगण्याचा अर्थ गवसला, की जीवन सुंदर होते.’’ प्रारंभी दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या पुतळ्याला तसेच स्व.गिरीश लोडाया यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक सुभाष मोहकरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.नागेश कान्हेकर यांनी केले. नरेंद्र झाल्टे यांनी आभार मानले. या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, व्याख्यानमालेचे अध्यक्ष संतोष पाटील, चिटणीस अजित मंडलिक यांच्यासह पदाधिकारी, सदस्य, नागरिक, महिला आणि श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button