मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील लाभार्थ्यांना वेतनाची प्रतिक्षा
लाडक्या भावाचा शासनाकडून अपेक्षाभंग..?
परभणी(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहीण योजने पाठोपाठ राज्यातील युवकांसाठी लाडका भाऊ योजना सुरू केली.एकीकडे शासनाने भगीणींना 3 हप्ते थेट बँक खात्यात जमा केले आहेत. तर दुसरीकडे मात्र लाडका भाऊ योजनेतून रोजगार मिळवलेले भाऊ अजुनही वेतनासाठी प्रतिक्षेत आहेत.शासनाने युवकांचा अपेक्षा भंग न करता तातडीने विद्यावेतन बँक खात्यात जमा करावे अशी मागणी होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 10 लाख युवकांना सक्षम करण्यासाठी आणि स्वत: च्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून 35 वर्षांपर्यंत वयोमर्यादा असलेल्या युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना(लाडका भाऊ) योजनेची घोषणा केली.काही दिवसांनंतर या योजनेची व्याप्ती वाढवून 12 वी पास, डिप्लोमा आणि पदवीधर तरुणांसमोर तरुणींचाही यात समावेश केला. त्यासाठी सहा महिने दरमहा 6 ते 8 हजार,आणी 10 हजारांचे विद्यावेतनही जाहीर केले.
अनेक निमशासकीय संस्था शासनमान्य खाजगी संस्था, कंपन्यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. लाखों तरुणांनी जुलै, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांत अर्ज दाखल करुन नियमाप्रमाणे या योजनेत सहभागी झाले आहेत.संबधीत आस्थापना त्यांकडून कामही करवून घेत आहेत.मात्र त्यांना या कामासाठी विद्यावेतन शासन देणार की, संबंधित आस्थापना देणार हे मात्र कळू शकले नाही.
लाडकी बहीण योजना सुरू झाली. बहीणींना आज रोजी पर्यंत तीन हप्त्यांचे 4500 रुपये अनुदान वाटपही शासनाने केले परंतु शासनाकडून विद्यावेतन (स्टायपेड) मिळेल या आशेने दोन महिन्यांपासून काम करत असलेल्या युवक युवतींना शासनाने तसेच रोजगार उपलब्ध करून देणा-या संस्थानी अजुन एकही महीन्याचा रुपयाही तरुणांना न दिल्याने युवकवर्गात शासनाविरुद्ध नाराजीचा सूर उमटत आहे.शासनाने ही योजना केवळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर जाहीर केली नाही ना..? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत सहभागी होऊन अनुभवाच्या जोरावर कुठे तरी नौकरी मिळेल या आशेने परभणी जिल्ह्यातील हजारो तरुण तरुणींनी या कौशल्य व रोजगार विभाग अंतर्गत सुरु असलेल्या लाडका भाऊ या योजनेत तुटपुंज्या विद्यावेतनावर काम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.परंतु शासनाने ज्या घाई गडबडीत तरुणांना या योजनेकडे आकर्षित केले त्या नुसार त्यांना विद्यावेतनही दरमहा न चुकता अदा करणे आवश्यक आहे.