
परभणी (प्रतिनिधी)
येथील दर्गा हजरत सय्यद शाह तूराबूल हक साहेब यांचा उर्स येत्या 2 ते 10 फेब्रुवारी दरम्यान साजरा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या वतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेचा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. उच्च न्यायालयात 28 जानेवारीला यासंबंधी सुनावणी होणार आहे.
उरसानिमित्त दर्गा परिसरात स्टॉल बांधणे, विद्युतीकरण करणे व करमणुकीची साधने लावण्याची टेंडर यंदा एकत्र करण्यात आले आहे. यासाठी एक जानेवारी रोजी जाहिरात देऊन वक्त मंडळांनी ऑनलाइन निविदा मागवल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत मनमानी कारभार झाल्याचा आरोप करत परभणी येथील श्री साई मल्टी सर्विसेस च्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका माननीय उच्च न्यायालयाने 23 जनेवारीला दाखल करून घेतली असून या संदर्भात महाराष्ट्र शासन, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्त मंडळ, जिल्हा वक्फ अधिकारी व रचना इलेक्ट्रिकल्स यांना नोटीस काढण्यात आले आहेत. आता या प्रकरणात येत्या 28 जानेवारीला सुनावणी होणार आहे त्यापूर्वी वक्फ मंडळाच्या वतीने या निविदेसंबंधी काढण्यात आलेली वर्क ऑर्डर या निर्णयावर अवलंबून राहणार असल्याचेही माननीय उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता येत्या 28 जानेवारी सुनावणीत माननीय उच्च न्यायालय काय निर्णय घेणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.