ग्रामीण बँकिंगच्या समस्यांकडे लक्ष द्या – डॉ. फौजिया खान यांची मागणी

नवी दिल्ली – राज्यसभेत बँकिंग रेग्युलेशन (सुधारणा) विधेयकावर चर्चा करताना खासदार डॉ. फौजिया खान यांनी विधेयकातील त्रुटींवर प्रकाश टाकला आणि ग्रामीण बँकिंग व तांत्रिक आव्हानांसंदर्भात महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या.डॉ. खान यांनी मोठ्या व्याजाच्या परिभाषेसाठी प्रस्तावित दोन कोटी रुपयांच्या मर्यादेला चलनवाढीशी जोडण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, ग्रामीण आणि सहकारी बँकांना तांत्रिक सुविधा व सक्षम क्रेडिट वितरण प्रणालीची आवश्यकता असल्याचे नमूद केले. वाढत्या बँकिंग घोटाळ्यांचा संदर्भ देत त्यांनी सहकारी बँकांमध्ये गेल्या पाच वर्षांत 4,016 आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगितले, ज्यामुळे खातेदारांना नुकसान सोसावे लागले आहे.तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या जोखमींवरही त्यांनी प्रकाश टाकला. बँकिंग प्रणालीतील सायबर सुरक्षेच्या वाढत्या धोक्यांविषयी चिंता व्यक्त करत त्यांनी सरकारी धोरणे यासाठी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे नमूद केले.डॉ. खान यांनी बनावट चलनी नोटांचा वाढता धोका अधोरेखित करत सांगितले की 2018 ते 2022 दरम्यान ₹500च्या नोटांमध्ये 317% आणि ₹2000 च्या नोटांमध्ये 166% वाढ झाली आहे. आधार व केवायसी नियमांमुळे अनेकांचे बँक खाते गोठवले जात असल्याने सामान्य नागरिकांवर होणाऱ्या परिणामांविषयीही त्यांनी चिंता व्यक्त केली.अखेर, बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी सरकारने व्यापक सुधारणा कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. “सुधारणांसाठी सज्ज राहा, कारण सुरक्षित बँकिंग प्रणाली ही आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.