पालम पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
जामिनासाठी नेण्याकरीता मागितले दहा हजार रुपये

परभणी (प्रतिनिधी) जुगार खेळताना मिळून
आलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यातील तक्रारदार व त्याच्या मित्रास एलसीबी परभणी येथे न नेता पालम तहसिल येथे जामिनासाठी नेण्याकरीता प्रत्येकी पाच हजार प्रमाणे दहा हजाराची लाच मागण्यात आली. लाच स्विकारताना परभणीच्या लाचलुचपत विभागाने कारवाई केली. पालम पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश राजन्ना दोनकलवार, पोलीस हवलदार राजेश राजलिंगम येसुरकर, पोलीस शिपाई अशोक भास्करराव केदारे हे जाळ्यात अडकले आहेत. गुरुवार 12 जून रोजी सदर कारवाई करण्यात आली.
या बाबत अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी महिन्यात काही इसम जुगार खेळताना मिळून आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या मित्रास आरोपी केले होते. या दोघांना स्थागुशा परभणी येथे न घेऊन जाता पालम तहसिल मध्ये जामिनासाठी नेण्याकरीता दहा हजार रुपये लाच मागणी केल्याची तक्रार परभणी कार्यालयाला प्राप्त झाली. 10 जून रोजी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. या दरम्यान पोशि. केदारे यांनी तक्रारदार यांना सपोनि.दोनकलवार यांच्या कक्षात नेले. या ठिकाणी केदारे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये सांगितले
असल्याची माहिती दोनकलवार यांना दिली. त्यावर दोनकलवार यांनी तक्रारदारांना “जो बोला है वो करदे” असे म्हणत संमत्ती दर्शवून प्रोत्साहन दिले. त्यानंतर 12 जुनला सापळा कारवाई करण्यात आली. पोह. राजेश येसुरकर यांनी दहा हजार रुपये तक्रारदार यांचा मित्र, साक्षीदार यांच्या समक्ष
स्विकारले. पोलीस अंमलदार येसुरकर यांना लाचेच्या रक्कमेसह व सपोनि. दोनकलवार, पोशि. केदारे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधितांवर पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलूचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक महेश पाटणकर, पोनि. अलताफ मुलाणी, मनिषा पवार यांच्या पथकाने केली.