मुलींची छेड काढण्याऱ्यावर होणार कठोर कारवाई -जिल्हा पोलिस अधिक्षकांचा इशारा
दामिणी पथक व साध्या वेशातील पोलिसांची ठिकठिकाणी देखरेख
परभणी,दि.30(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मुलींसह महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दामिणी पथक स्थापन करण्यात आले असून नागरीकांना मदतीसाठी पोलिस काका व महिलांसाठी पोलिस दिदि पथकांची देखील स्थापना करण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालय तसेच बाजारपेठा व अन्य गर्दीच्या ठिकाणी साध्या वेषातील पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी दिली. कोणाही रोडरोमिओने महिला किंवा मुलींची छेड काढू नये, अन्यथा छेड काढणार्यांची खैर नाही, असा इशाराही दिला.
महाविद्यालयातील विद्यार्थीनी राज गोपलाचारी उद्यानात जेवणासाठी बसल्या असता त्यांची एका युकाने छेड काढल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी स्वतः फौज फाट्यासह घटनास्थळी पोहचून छेड काढणार्या युवकास ताब्यात घेवून नवामोंढा पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात आली.
आज गुरुवार 30 ऑगस्ट रोजी 12.30 वाजेच्या सुमारास महाविद्यालयातील विद्यार्थीनी डबा खाण्यासाठी बसल्या असता श्रवण टेकूळे (वय 19 वर्ष, रासाईबाबा नगर, परभणी) युवकाने तिथे येवून त्यांना वाईट उद्देशाने बोलून शिवीगाळ केली, जिवे मारण्याची धमकी दिली. या विद्यार्थीनी घाबरून गेल्या, त्यांनी लगेच सदरची माहिती पोलीसांनी दिली असता पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी स्वतः उप विभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, पोनि नवामोंढा शरद मरे, पोउपनि अर्जुन टरके व पोलीस अमलदार सचिन भदर्गे, मो. इम्रान, शेख रफीक, राहूल परसोडे, स्थागुशाचे पंकज उगले, अनिल कटारे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून सदर विद्यार्थीनींची छेड काढणार्या युवकास जेरबंद केले. त्याचे विरूध्द पोलीस ठाणे नवामोंढा परभणी येथे गुरनं 420/2024 कलम 74, 352, 351(2) (3) भान्या.सं. सह कलम 12 पोस्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, नागरीकांनी तात्काळ मदतीसाठी 112 या टोल फ्री क्रमांकावर किंवा महिला व मुलांकरीता अनुक्रमे 1091 व 1098 या टोल फ्री क्रमांकाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून मदत मिळवू शकता. परभणी जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत दामीनी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच नागरीकांना मदतीसाठी पोलीस काका व महिलांसाठी पोलीस दिदी पथकाची देखील पोलीस अधिक्षकांनी स्थापना केलेली आहे. शाळा महाविद्यालये तसेच बाजारपेठा व गर्दीचे ठिकाणी साध्या वेषातील पोलीसाची गस्त देखील वाढविण्यात आलेली आहे. नागरीकांनी मदतीसाठी तात्काळ पोलीसांना संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक परदेशी यांनी केले आहे.