सुप्रीम कोर्टाने गुरुवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. लग्नाच्या वेळी आई – वडिलांकडून दिल्या जाणाऱ्या स्त्रीधनावर फक्त त्या मुलीचा अधिकार असतो, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.लग्नाच्या वेळी काही सोन्याचे दागिने आणि इतर सामान मुलीला दिलं जातं, त्याला स्त्रीधन म्हटलं जातं. कोर्टाने म्हटलं की, घटस्फोटानंतर महिलेचे वडिल किंवा सासरची मंडळींना ते दागिने आणि इतर सामान परत मागण्याचा कोणताही अधिकार नाही
स्त्रीधन म्हणजे काय ?
स्त्रीधन म्हणजे अशी संपत्ती ज्यावर महिलेचा संपूर्ण अधिकार असतो. या संपत्तीच्या बाबतीतले सगळे निर्णय घेण्याचा अधिकार महिलेला असतो. महिलेला लग्नाआधी, लग्नाच्या वेळी, मुलांच्या जन्माच्या वेळी ज्या गोष्टी भेट म्हणून दिल्या जातात त्या सगळ्या गोष्टींना स्त्रीधन म्हटले जाते. उदाहरणार्थ – ज्वेलरी, रोख रक्कम, जमीन, प्रॉपर्टी इत्यादी. लग्नाच्या वेळी , मुलांच्या जन्माच्या वेळी मिळालेल्या गिफ्ट्ससोबतच महिलेच्या आयुष्यात तिला ज्या गोष्टी गिफ्ट म्हणून मिळतात, त्या सगळ्यावर फक्त महिलेचा अधिकार आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पी. वीरभद्र राव नावाच्या व्यक्तीने 1999 मध्ये त्यांच्या मुलीचं लग्न केलं. लग्नानंतर त्यांची मुलगी आणि जावई अमेरिकेत गेले. आता 16 वर्षांनंतर पी. वीरभद्र राव यांच्या मुलीने नवऱ्याकडून घटस्फोट मागितला आहे. घटस्फोटाच्या वेळी या नवरा – बायकोमध्ये प्रॉपर्टीची वाटणी करण्यात आली. त्यानंतर महिलेने मे – 2018 मध्ये पुन्हा लग्न केलं. तीन वर्षांनंतर पी. वीरभद्र राव यांनी मुलीच्या सासरच्या मंडळींच्या विरोधात हैदराबाद पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी स्त्रीधन परत द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांच्या मुलीच्या सासरच्या लोकांनी FIR रद्द करण्यासाठी तेलंगाणा हायकोर्टाकडे दाद मागितली. पण FIR रद्द न झाल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे अपील केली. जस्टिस जेके माहेश्वरी आणि जस्टिस संजय करोल यांच्या बेंचने सासरच्या लोकांच्या विरोधातली तक्रार रद्द केली. मुलीच्या वडिलांना तिचं स्त्रीधन परत मागण्याचा कोणताही अधिकार नाही. स्त्रीधन ही त्या मुलीची संपत्ती आहे.
कोर्टाने पुढे सांगितलं की, वडिलांनी 20 वर्षांनंतर अर्ज केला आहे. स्त्रीधन दिल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. घटस्फोटाच्या वेळीही स्त्रीधनाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, स्त्रीधनावर इतर कोणाचाही अधिकार नाही. कपडे, दागिने आणि महिलेला दिलेल्या सगळ्या गोष्टींवर तिचाच अधिकार आहे. घटस्फोट झालेला असला तरीही तिला मिळालेल्या स्त्रीधनावर तिचाच अधिकार आहे. महिलेच्या वडिलांचाही त्यावर अधिकार नसतो.
स्त्रीधन आणि हुंड्यामध्ये फरक काय ?
हिंदू विवाह कायद्यानुसार स्त्रीधन आणि हुंडा यात फरक करण्यात आलेला आहे. स्त्रीधन म्हणजे महिलेला स्वेच्छेने देण्यात आलेल्या भेटवस्तू. प्रेमापोटी लग्नात महिलेला काही वस्तू गिफ्ट म्हणून दिल्या जातात. त्यात कोणतीही जबरदस्ती केली जात नाही. त्यामुळे स्त्रीधनावर त्या स्त्रिचाच अधिकार असतो.लग्नाच्या वेळी काही सोन्याचे दागिने आणि इतर सामान मुलीला दिलं जातं, त्याला स्त्रीधन म्हटलं जातं. कोर्टाने म्हटलं की, घटस्फोटानंतर महिलेचे वडिल किंवा सासरची मंडळींना ते दागिने आणि इतर सामान परत मागण्याचा कोणताही अधिकार नाही.