तोतया पोलिसांनी सतरा लाखाला फसवले
सेलू (प्रतिनिधी)
मनी लॉन्ड्रीग च्या प्रकरणात आपण फसले असल्याचे सांगून भामट्यांनी 17 लाख 38 हजार 98 रुपयाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
सेलू शहरातील प्रतिक नंदलाल कुंदनानी यांनी तक्रार दिली आहे. 20 ऑगस्टच्या दुपारी त्यांना अज्ञाताने फोन केला. कम तुमचे पार्सल ईराण येथील सीमा शुल्क विभागाने पकडले आहे. आपण मुंबई क्राईम ब्रांचकडे तक्रार करा, असे म्हणत ऑनलाईन कॉल जोडून दिला. त्यानंतर समोरील व्यक्ती हिंदी भाषेमध्ये मी क्राईम ब्रांचमधून बोलत आहे, आपण मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाशी जोडलेले आहात, तुमच्या विरुध्द निघालेले वारंट तुर्त स्थगित ठेवले आहे, असे सांगितले. फिर्यादीचे आधार कार्ड घेत नेट बँकिंग लॉगिन करायला लावून त्यांच्या नावे असलेली मुदत ठेव तोडण्यास लावली. सर्व रक्कम फिर्यादीच्या खात्यात जमा झाल्यानंतर बँकेतील कर्मचारी माहिती लिक करतील, आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला काही होणार असे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपीने युपीआय, आयएमपीएस, धनादेशाद्वारे 17लाख 38 हजार 98 रुपये घेत फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सेलू पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. सावंत करत आहेत.