देश

कृषी मंत्र्यांनी वनामकृवित आढावा बैठकीत केल्या सूचना

परभणी(प्रतिनिधी)
मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे कृषि मंत्री धनंजय मुंडे हे बुधवारी (दि.4) परभणीच्या दौर्‍यावर आले असता त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास भेट दिली व आढावा बैठक घेतली.
यावेळी विधान परिषद सदस्य राजेश विटेकर, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये कृषि मंत्री मुंडे यांनी विद्यापीठाने अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या रक्षणाकरिता आणि सद्यस्थितीत पीक व्यवस्थापनासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, विद्यापीठाने विकसित प्रक्षेत्रावर पूर्णतः संगणकीकरण तसेच यांत्रिकीकरण करून स्वयंचलित शेती विकसित करावी तसेच ड्रोनद्वारे फवारणीबाबत चर्चा करून ड्रोन फवारणीसाठी विद्यापीठाने सध्या आकारलेला दर कमी करावा. ड्रोनचा वापर सध्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी करावा आणि पिकांचे कितपत नुकसान झाले याचा अंदाज घ्यावा असे नमूद केले. पिकांच्या उत्पादनामध्ये नॅनो खतांमुळे उत्पादन खर्चात 60 टक्के बचत होईल आणि उत्पादनात 50 % ने वाढ होवू शकते असे नॅनो खतांचे महत्त्व असल्याने नॅनो खताच्या वापरास चालना द्यावी.
नॅनो खते मोफत देण्यासाठी शिफारस आणि प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार द्यावा. याबरोबरच सोयाबीन उत्पादनामध्ये सोया मिल्क म्हणून उत्पादित करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षिता आणि प्रमाण संस्था यांच्याकडे पाठपुरावा करावा. याबरोबरच विद्यापीठांमध्ये बांबू लागवडीसाठी चालना देण्यासाठी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर तसेच रस्त्यालगत बांबूची लागवड करावी अशा सूचना दिल्या.
यावेळी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी बिजोत्पादनासाठी विद्यापीठाने साडेतीन हजार एकर जमीन विकसित केल्याचे तसेच महाराष्ट्र मेकॅनायझेशन सेंटर बाबत माहिती दिली. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठाचे बीजोत्पादन मागील वर्षी 10 हजार 200 क्विंटल झाले होते. यावर्षी हे लक्ष दुपटीने करून 20 हजार क्विंटलवर नेण्यात येईल व भविष्यात 50 हजार क्विंटलचे लक्ष निर्धारित केल्याचे सांगितले. तसेच विद्यापीठाने शेतकर्‍यांच्या विकासासाठी तसेच शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठाने विदेशातील व देशातील अग्रगण्य विद्यापीठे व संस्थेसोबत सामंजस्य करार केले असून याचा लाभ कुशल मनुष्यबळ निर्मितीस होणार असल्याचे नमूद केले.
कुलसचिव डॉ. संतोष वेणीकर यांनी विद्यापीठाचा महसूल वाढ होण्याच्या दृष्टीने बीजोत्पादन प्रकल्प, उती संवर्धित केळी आणि उसांच्या रोपांना मागणी असल्याने या प्रकल्पांना मंजूर देण्याची विनंती केली. यावेळी नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. आर डी क्षीरसागर, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. राजेश कदम, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, लातूर विभागाचे कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील प्रमुख शास्त्रज्ञ आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button