पूर्णा/प्रतिनिधी
येथिल पंचायत समिती कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन व भविष्य निर्वाह निधी बोगस कागदपत्रांच्या आधारे वळता करुन लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनीच अपहार करत सुमारे दिड कोटी रुपयांचा चुना लावल्याचे प्रकरण उघडकीस आले.परंतू याप्रकरणात स्थानिक गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या वरीष्ठांकडून याप्रकरणी कोणत्याही चौकशीला सुरुवात झाली नसल्याने या घोटाळ्याला वाचा फुटणार की प्रकरण सोपस्कार पार पाडून गुंडाळून ठेवले जाणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पूर्णा येथील पंचायत समिती कार्यालयात लेखा विभागातील कर्मचार्यांनी सन 2022-23 काळात सेवानिवृत्त कर्मचा-र्यांच्या पेन्शन योजना,भविष्य निर्वाह निधीत बोगस कागदपत्रे तयार करून सदरील रक्कम ही दुसर्याच्या नावे बँकेत टाकून जवळपास दीड कोटी रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वीच लेखापरीक्षणानंतर उघडकीस आली होती.सदरील प्रकरणात येथिल लेखा विभागाच्या कारकुनाचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.हा अपहार उघडकीस आल्यानंतर सदरील कर्मचारी काही दिवसांपासून हा गायब झाला होता.याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या वतीने सखोल चौकशी करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कोणत्याही चौकशीला सुरुवात झाली नाही . त्यामुळे याप्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे.उघडकीस आलेल्या अपहाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राहुल गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.मात्र यामध्ये पंचायत समितीसह जिल्हा परिषदेचे काही महाभाग गुंतले असल्यानेच की काय चौकशीसाठी टाळाटाळ तर केली जात नाही ना..? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
पूर्णा पंचायत समितीच्या पेन्शन घोटाळ्याचा पर्दाफाश होऊन 15 ते 20 दिवसांचा कालावधी लोटला आहे.मात्र याप्रकरणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठांनी चौकशी समिती नेमुन संबंधीत दोषींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते.परंतु संबंधित विभाग याबाबतीत चिकार शब्दही काढायला तयार नसल्याने या प्रकरणाचे गौडबंगाल आणखीनच वाढत चालले आहे.याप्रकरणाचे बिंग फुटल्यावरच पेन्शन योजनेत नेमका कीती अपहार झाला कोणाच्या नावावर कीती रक्कम परस्पर उचलून घेण्यात आली.किती जणांनी यामध्ये हात धुवून घेतले हे उघडकीस येणार आहे.