परभणी (प्रतिनिधी) खुनातील आरोपींना परभणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी जन्मठेप, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास तसेच भादंवि कलम 201 मध्ये पाच वर्ष सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, 6 जून 2020 रोजी हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलीस ठाण्यात इसम बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. चौकशी दरम्यान बेपत्ता इसमाचा खून झाल्याचे पुढे आले. संशयीतांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता बेपत्ता व्यक्ती मारोती साळवे यांचा गळा आवळून खून केल्याचे संशयीतांनी सांगितले. त्यानंतर संबंधिताचा मृतदेह कालव्यात फेकला. मृतदेहाच्या शोधा दरम्यान ताडकळस पोलीस ठाणे हद्दित लोहगाव शिवारात मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सुरुवातीस अकस्मात मृत्यूची नोंद ताडकळस पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात सदर इसमाचा मृत्यू गळा आवळून झालेला आहे, असे स्पष्ट झाल्याने झाल्याने या प्रकरणात कुणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. प्रकरणाचा तपास सपोनि. वसंत मुळे यांनी केला. तपासा दरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेला रुमाल व दारुची बॉटल जप्त करण्यात आली. सपोनि. मुळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी देविदास सटवाजी साळवे हा मयत झाला आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव गजानन मुरलीधर साळवे, असे आहे. सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शरनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सपोनि. संतोष सानप, पोउपनि, सुरेश चव्हाण, पोलीस अंमलदार प्रमोद सुर्यवंशी, मंगल साळुंखे यांनी काम पाहिले. मुख्य सरकारी वकीलज्ञानोबा
दराडे यांनी सरकार
पक्षातर्फे या प्रकरणात भक्कम बाजु मांडली.